उत्तर प्रदेश : समाजवादी पार्टी यापुढे निवडणुकीत कोणत्याही मोठय़ा राजकीय पक्षासोबत आघाडी करणार नाही. तर छोटय़ा पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढेल, अशी घोषणा सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची हीच भूमिका राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीने प्रथम काँग्रेससोबत आघाडी केली होती. त्यानंतर मायावती यांच्या बसपाशी आघाडी केली. पण राष्ट्रीय स्तरावरील मोठय़ा पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढण्याचा प्रयोग यशस्वी झाला नाही. त्यामुळे यापुढे स्थानिक छोटय़ा पक्षांशी समन्वय साधून निवडणुका लढण्याचा निर्णय सपाने घेतला आहे. दिवाळीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा अखिलेश यादव यांनी शनिवारी केली.