बीड जिल्ह्यातील सर्व प्रमुख बँकांच्या अधिकारी/प्रतिनिधी यांच्याशी आज सार्वजनिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा केली. यावेळी पिककर्ज वाटपाचा वेग वाढविण्या संदर्भात मुंडे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कर्जवाटपाच्या केवळ उद्दिष्टपूर्तीचा विचार न करता कर्जमाफितून पात्र झालेले व नव्याने पात्र असलेले अशा सर्वच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात यावे. नव्या कर्ज प्रकरणांसाठी आठवड्यातील एक दिवस बँकांनी राखीव ठेवावा, खाजगी फायनान्सचे नो ड्युज, नाहरकत अशा कारणांसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये; तसेच सीबील – क्रेडिटच्या बाबतीत बँकांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेत शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही मुंडे यांनी यावेळी सूचित केले.
जिल्ह्यातील काही शहरांमध्ये १२ तारखेपासून १० दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे, या काळात बँकांनी प्रलंबित पीककर्ज प्रकरणे निकाली काढावीत, तसेच कर्जप्रक्रियेमध्ये कागदपत्र व प्रस्ताव संकलन ग्राहक सेवा केंद्रे व बँक कर्मचारी यांच्या माध्यमातून करून लॉकडाऊनचा प्रक्रियेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असे देखील मुंडे यांच्याकडून अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
जिल्ह्यातील आजमितीला असलेल्या कोविड परिस्थितीचा घेतला घेतला आढावा
वाढती रुग्णसंख्या, ही जरी चिंतेची बाब असली तरी त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अँटिजेन टेस्टचे प्रमाण वाढवणे, त्यासाठी आवश्यक किट्सची उपलब्धता, उपलब्ध बेड, आवश्यकतेनुसार क्वारंटाईन सेंटर वाढवणे याबाबत संबंधितांना सूचना यावेळी मुंडे यांच्याकडून करण्यात आल्या.
.
तसेच हा लॉकडाऊन कोरोनाच्या फैलावास ब्रेकडाऊन ठरावा या दृष्टीने आपण प्रशासनाला सहकार्य करा. हा लॉकडाऊन शेवटचा ठरावा या दृष्टीने सर्वांनी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहन देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी केले.