महाडमध्ये इमारत कोसळुन झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ६० जणांना वाचवण्यात यश आले आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे अद्याप 19 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ महाडमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. अजूनही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे याप्रकरणी जो कोणी दोषी आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल’
‘तसेच या दुर्घटनेत जखमी किंवा मृत व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारकडून योग्य ती मदत दिली जाईल. तसेच शहरात ज्या काही जुन्या इमारती आहेत. त्यांच्यासाठी क्लस्टर योजना आणली जाईल’, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात 05 मजली इमारत काल सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.