पुणे : मुंबईत जमावबंदीचा निर्णय लागू झल्यानंतर पुण्यात जमावबंदी लागू होण्याबात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले आहेत . विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला.
पुण्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत .
शहरी भागासह ग्रामीण भागातील ‘कोरोना’चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.