पुणे – माजी खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत आहे, असा दावा माजी खासदार संजय काकडे यांनी केला.
यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संजय काकडेंना फटकारलं. “त्या व्यक्तीची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा” अशा शब्दात अजितदादांनी संजय काकडेंना टोला लगावला. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते. (Ajit Pawar taunts BJP Leader Sanjay Kakade in Pune)
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी संजय काकडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले. “मी पुण्यात आहे. ज्या व्यक्तीने हे स्टेटमेंट केलं, त्याची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा. अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही” म्हणत अजित पवारांनी विषय बदलला.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.