पुण्यात कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवसी हे एकाच व्यासपाठीवर येणार आहेत. राज्यात काही महिन्यांपुर्वी मोठ्या सत्ता नाट्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र काही तासतच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा हे दोघेही नेते एकाच व्यापसपीठावर येणार असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
महापालिका प्रशासनाने ‘सीएसआर’च्या माध्यमातून बाणेर येथे सहामजली कोव्हिड रुग्णालय अवघ्या पंधरा दिवसांत उभे केले असून, त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे.
शपथविधीनंतर ते माढ्यात संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाला मुंबईत अजित पवार उपस्थित होते. आता ही तिसरी वेळ आहे, ज्यावेळी दोघे एकत्रित दिसणार आहेत.
बाणेरमधील या कोव्हिड सेंटरमध्ये 270 ऑक्सिजन आणि 44 व्हेंटिलेटर बेड्स असे एकूण 314 बेड्सची व्यवस्था आहे. पुणे शहरातील हे दुसरे सर्वात मोठे कोव्हिड सेंटर आहे.