कोल्हापुर: कोल्हापुरातील गोकुळ(जिल्हा दूध उत्पादक संघ )ची निवडणूक नुकतीच झाली. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या जोडगोळीने माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील गटाचा १७-४ असा धुव्वा उडवत गोकुळवर सत्ता स्थापित केली. तब्ब्ल ३० वर्षानंतर सत्तापालट करण्यात विरोधी गटाला यश आले. गोकुळ नंतर देखील कोल्हापुरात राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्के दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांचे होमग्राऊंड असलेल्या कोल्हापुरातील भुरदगड तालुका पंचायतीमधील भारतीय जनता पक्षाच्या एकमेव सदस्या आक्काताई नलवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थिती पंचायत समिती सदस्य आक्काताई नलवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आक्काताई नलवडे ह्या आकुर्डे पंचायत समिती गणाचे नेतृत्व करतात. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं गाव असणाऱ्या पंचायत समितीमधील सदस्यच गळाला लागल्याने चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी खासदार संजयदादा मंडलिक, प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोकुळचे नूतन संचालक नंदकुमार डेंगे, राहुरी कृषी यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते .भुदरगड पंचायत समितीचे एकूण 8 सदस्य आहेत. मागील वेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 2 आणि भारतीय जनता पक्षाला 1 जागा मिळाली होती. आता भारतीय जनता पक्षाचा सदस्य शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर शिवसेनेचे संख्याबळ 6 झालं आहे. यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात जोरदार चर्चा रंगली आहे.