मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. निलंबित असलेल्या सचिन वाझेंना पोलीस दलात पुन्हा परत का आणण्यात आले ? असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे. यातच आता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आग्रहामुळेच वाझेंची नियुक्ती झाल्याचे म्हटले आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी घेतला असून त्यांच्या आग्रहामुळेच सह आयुक्तांना वाझेंची नियुक्ती गुन्हे शाखेतील गुन्हेगार गुप्तवार्ता कक्ष (सीआययू) या अत्यंत महत्त्वाच्या विभागात नाइलाजास्तव करावी लागली. वाझे पदानुक्रम टाळून थेट सिंग यांना रिपोर्ट करत. तसे सिंग यांचे तोंडी आदेश होते, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह विभागाला दिलेल्या अहवालात नमूद केली.
गुन्हे शाखेमध्ये तपास अधिकारी हा सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त आणि त्यानंतर सहपोलिस आयुक्तांना रिपोर्ट करतो. परंतु, वाझे या सर्वांना डावलून थेट पोलिस आयुक्तांना रिपोर्टिंग करीत होते, असे या अहवालात म्हटले आहे.
मुंबई पोलिसांनी गुन्हे अन्वेषण शाखेला अधिकृतरित्या तीन वाहने दिली होती. परंतु वाझे दक्षिण मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयात मर्सिडिस बेन्झ, ऑर्डी किंवा अन्य आलिशान खासगी मोटारीने येत असत. टीआरपी गैरव्यवहार, डीसी कार घोटाळा, अंबानी धमकी प्रकरण इत्यादीबाबतच्या मंत्रिस्तरावरील आढावा बैठकीसाठी वाझे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर यांच्यासह प्रत्येकवेळी उपस्थित राहात असत, असेही अहवालात म्हटले आहे.