मुंबई : परमबीर सिंग यांनी पत्रातून केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या गंभीर आरोपाची, सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून, तातडीने आपल्या पदाचा राजीनामा काल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. त्यानंतर काही काळ रिक्त असलेल्या या पदाचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे होता. परंतु, आज या पदाचा कार्यभार, माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला.
त्यानंतर, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची ‘सिल्व्हर ओक’ येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, “गृहमंत्रिपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. आजच मी त्या पदाची सूत्रं हाती घेणार आहे. ही सूत्रं हाती घेण्यापूर्वी मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचं मार्गदर्शनही घेतलं,” असे उद्गार काढले.
तसेच, आज नवनिर्वाचित गृहमंत्र्यांनी, पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, ‘सध्याचा काळ कठीण असून प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन,’ अशी ग्वाही दिली. यासोबतच त्यांनी राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या प्रश्नावरही सूचक विधान केलं आहे. “कुणाची निकाय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, त्यांच्यासोबतचा युवक कारकिर्दीतील एक फोटो समाज माध्यमांवर पाठवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोखाली त्यांनी, “माझे जुने मित्र ना. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त… कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा!” असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
माझे जुने मित्र ना. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा!@Dwalsepatil pic.twitter.com/wd65NfhCIb
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 6, 2021