सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे आज भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. भालके यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार असून पंढरपूरमध्ये पक्षात मोठे खिंडार पडणार आहे. साखरसम्राट म्हणून ओळख असणारे अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून भालके हे नाराज होते, काही दिवसांपूर्वीच त्यांनी BRS प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर केसीआर हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पांडुरंगाच्या दर्शनाला येत आहेत. जवळपास सहाशे गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर पंढरपुरात दाखल होतील. यावेळी त्यांच्या उपस्थितीत भालके यांचा जाहीर प्रवेश होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जवळपास 1 लाख 5 हजार मते घेऊन अगदी थोडक्या मतांनी पराभूत झाले. मात्र भालके यांना राष्ट्रवादीकडून डावलण्यात येत असल्याने विठ्ठल परिवारातील भालके गट नाराज होता. नाराज भालके यांना आपल्या गोटात घेण्यासाठी के चंद्रशेखर राव यांनी संपर्क साधत भेटीसाठी खास विमान सोलापूरला पाठवले होते.