मुंबई : शिवसेनेन बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार असून, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधातही शिवसेना उमेदवार देणार आहे.बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली.
गुप्तेश्वर पांडे बक्सर जदयूच्या तिकीटावर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आलं. लोकांना कळतंय यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता. तरीही सूडबुद्धीचं राजकारण केलं गेलं. आम्ही आता बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करणार आहोत. बिहार निवडणुकीत आम्ही ५० जागा लढवत आहोत. २०१५ ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतं शिवसेनेनं घेतली होती,” अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.
डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता हे सर्वांनी पाहिलं होतं. या पदावर राहून असं वक्तव्य करणं हे पांडेंना न शोभणारं होतं. पण आमचा मावळा त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पांडेंना महाराष्ट्राची ताकद कळेल, आम्ही त्यांच्यासमोर उमेदवार देत आहोत,” असंही अनिल देसाई म्हणाले.