पिंपरी चिंचवड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पुण्यातील एका कार्यक्रमानंतर राजकीय समीकरणे बदलण्या बाबत गौप्यस्फोट केला. अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातील देखील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले.
अजित पवार यांचे निकटवर्तीय अभय मांढरे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, भाजपच्या नगरसेवकांचा मोठा गड भाजपच्या कार्यशैलीवर नाराज आहे. या नगरसेवकांना काम करायचं आहे. मात्र त्यांची संधी नाकारण्याचे प्रताप भाजपकडून केले जात आहे त्यामुळे काम करण्याची इच्छा असूनही संधी मिळत नसल्याची खंत अनेक जणांच्या मनात आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, संतोष बारणे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून आम्हाला तुमच्या सोबत काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे स्पष्टीकरण अभय मांढरे यांनी देखील दिले.
पुढे मांढरे यांनी सांगितले की,”नगरसेवक रवि लांडगे यांच्या अजित पवार भेटीमुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा भाजप ला एक धक्काच आहे. काहीजण स्वबळावर निवडून आले आहेत त्यांना चांगले काम करायच आहे. मात्र पक्षाचा पुढे जाऊ शकत नसल्याने त्यांची कोंडी होत आहे.”