पंढरपूर: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांनीही अर्ज दाखल केल्यामुळे ते राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची भेट घेवून सिद्धेश्वर आवताडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र , मोहिते पाटील यांची ती शिष्टाई अयशस्वी ठरली आहे. सिद्धेश्वर आवताडे यांनी माघार न घेता आपला प्रचार दौरा जोमाने सुरू ठेवला आहे. याबाबत सिद्धेश्वर आवताडे म्हणाले की, मतदारसंघातील तरुणांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज भरला आहे. मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणामध्ये विविध सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही भरीव विकास कामे केली आहेत. मी कुणाच्या विरोधात म्हणून अर्ज भरलेला नाही तर लोकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहे म्हणून अर्ज भरला आहे.
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे काहींना वाटते की आमच्यात ( समाधान आवताडे आणि सिद्धेश्वर आवताडे ) वाद आहेत. आमच्यातील वाद मिटेल; पण नेतृत्व कोणाचे स्वीकारायचे, हे जनतेच्या हातात आह , असे मंगळवेढा खरेदी विक्री सहकारी संघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू, अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी व्यक्त केले आहे.
तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी, मतदारसंघातील विकासकामासाठी, तसेच माता भगिनींच्या संरक्षणासाठी मी प्रयत्न करणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्यावर आतापर्यंत निवडणून आले. पण, प्रत्यक्षात पाणी मात्र आले नाही. निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या निमित्ताने पाणी आणतो; म्हणून अनेक नेते येतील. पण ते या मतदारसंघातील मतदारही नाहीत. सोलापूर, पुणे ही शहरे ज्या प्रमाणे स्मार्ट झाली, त्या पद्धतीने तरुणांनी व तालुक्यातील मतदारांनी मला संधी दिली, तर मंगळवेढा आणि पंढरपूर ही शहरे स्मार्ट करण्यासाठी माझा प्रयत्न राहील.