पुणे महापालिकेत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन पुणे शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटल विषयी चर्चा केली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये खुन्नस काढली जाते आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या मतदारसंघातील विकास कामेही ते होऊ देत नाहीत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हे सरकार खुनशी, विरोधी पक्षातील नेत्यांच्या मतदारसंघातली विकास कामे होऊ देत नाहीत, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे कोणतेही आमदार पवारांच्या संपर्कात नाहीत. जुने संबंध सर्वांचेच आहेत. काही काम असतात त्यामुळे भेटीगाठी होतच राहतात. परंतु या सरकारमध्ये खूप खुन्नस काढली जात आहे. मतदारसंघातली साधी विकासकामेही होत नाहीत. यासाठी लोकप्रतिनिधींना वरिष्ठ नेत्यांशी भेटणं आवश्यक असतं. त्याचा अर्थ ते त्या पक्षात चाललेत असा होत नाही. पवार आणि महाविकासआघाडी “आपले आमदार कुठे जात नाही त्यांचेच आणतो” असे सांगून आपल्या आमदारांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत., असे चंद्रकांत पाटील म्हणाले.