देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी नियमांचे पालन करून नागरिकांसमोर उदाहरण ठेवणे गरजेचे असते. मात्र महाराष्ट्रातील भाजप खासदारच नियम पाळताना दिसत नाहीत. भंडारा गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी थेट रात्री 11 वाजता केंद्र आणि राज्य शासनाचे नियम मोडत रात्री 11 वाजता सलून उघडायला लावले.
कोरोना व्हायरसमुळे रात्री दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. सोबतच सलूनच्या दुकानात मास्क लावणे देखील अनिवार्य आहे. मात्र सुनील मेंढे विना मास्कचेच कटिंग करत होते. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फक्त केस कापण्यासाठी सुनील मेंढे यांनी रात्री 11 वाजता लॉकडाऊनचे नियम मोडत सलूनचे दुकान उघडे ठेवायला लावले. याच वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी व्हिडीओ काढला. काही नागरिकांनी रात्री अकरानंतर कुठल्या कायद्यात दुकान सुरू आहे, असा प्रश्न त्यांच्या गार्डला विचारला. त्यावेळी त्या गार्डने मला काही विचारु नका, साहेबांना विचारा, असे सांगत तोंड वळवले.
मात्र सुनील मेंढे यांना कोणीतरी आपला व्हिडीओ काढत असल्याचे लक्षात आले. त्यांनी स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हिडीओ काढणे बंद असे लक्षात आल्यानंतर मेंढे यांनी दुकानाबाहेर येत गाडीत बसून पळ काढला.