मुंबई : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांचा जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात होता.
याप्रकरणात कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.
आरोपी शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन जादूटोणा करत असताना, पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलीस अधिक तपास करत आहेत.