अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणासोबतच आता राज्यातील काही महत्त्वाच्या हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता त्याची चर्चा देखील जोर पकडू लागली आहे. जुन्या तपासांचे काय झाले असा प्रश्न विचारला जात आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) मुख्य आरोपीपर्यंत पोहचण्यास अद्याप यश आलेले नाही. दाभोलकर यांच्यासह पुणे परिसरातील तीन हत्यांचा तपास अनेक वर्षे सीबीआयला लागलेला नाही.
डॉ. दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला पुणे पोलील आणि त्यानंतर सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करून त्यांच्याविराधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, अद्याप या गुन्ह्यातील सूत्रधार पकडले गेले नाहीत.
23 नोव्हेंबर 2009 रोजी जंगली महाराज रस्त्यावरील अनंत चेंबरमध्ये निखील राणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून गोळीबार करत त्यांचा खून केला होता. या प्रकरणात देखील आता एक दशक उलटले तरीही ओरीपाचा शोध लागलेला नाही.
13 जानेवारी 2010 रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची तळेगांव येथे भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास देखील सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. पंरतू, या गुन्ह्याची पूर्ण उकल करण्यात सीबीआयला अद्यापही यश आलेले नाही.