नाशिक – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीवर छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही, असा टोला भुजबळांनी लगावला आहे.
छगन भुजबळांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घ्यायला पाहिजे. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार?, असा चिमटाही काढला.
सीबीआय, ईडीचा राजकीय उपयोग होतो हे माहीत होतं. आता न्याय देवताही त्यांच्या हातात आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे ईडी किंवा सीबीआय नाही, असं सांगतानाच अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे वडाचं तेल वांग्यावर टाकण्याचा प्रकार आहे, असा टोला भुजबळ यांनी लागवला.