मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी हे काल मुंबईत होते. त्यांनी गुरुवारी सकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी गडकरींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक संपन्न झाली. या बैठकीतला उद्धव ठाकरे-नितीन गडकरींचा एक फोटो व्हायरल होतोय. उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी बैठकीदरम्यान कुठल्याशा एका विषयावर चर्चा करताना मग्न झालेले दिसून येत आहेत.
गडकरींशी बैठक संपताच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाविषयी माहिती दिली. राज्यात 5500 कोटींची कामे महाराष्ट्रात मंजूर झाली आहेत, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली. गेल्या मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा घेतला आहे. आता मोठ्या गॅप नंतर आता पुन्हा एकदा आढावा घेतल्याचंही गडकरींनी सांगितलं.