मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार विनायक मेटे तसंच मराठा समाजाचं शिष्टमंडळ यांच्यात विशेष महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडत आहे. सरकारने जाहीर केलेल्या पोलिस भरती, मराठा आरक्षण तसंच आरक्षणावरील यापुढची होणारी सुनावणी अशा महत्त्वाच्या विषयांवर हा बैठकीत चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत 25 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीबाबत चर्चा होणार आहे. तसंच कोर्टातील सुनावणीबाबत सरकारच्या तयारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा नेत्यांना माहिती देणार असल्याची प्रतिक्रिया आमदार विनायक मेटे यांनी बैठकीअगोदर दिली आहे.
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण (SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला. मात्र या भरतीसंदर्भात शुद्धी परिपत्रक काढले जाणार आहे, असा दावा शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला. विनायक मेटेंनी बुधवारी संध्याकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. पोलीस भरतीच्या जीआरवर मेटेंनी आक्षेप घेतला होता. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर मेटेंनी हा दावा केला आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत इडब्ल्यूएस अर्थात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे जीआरवर आक्षेप घेत शुद्धी परिपत्रक काढण्याची मागणी आपण केली होती. अनिल देशमुख यांनी सात जानेवारीला (आज) शुद्धी परिपत्रक काढणार, अशी ग्वाही दिल्याचा दावा विनायक मेटेंनी केला. एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना इडब्ल्यूएसचा लाभ मिळेल, असा विश्वास मेटेंनी व्यक्त केला.