पंढरपूर: महाराष्ट्रात कोरोना महामारी थैमान घालत असताना मंगळवेढा – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मोठ्या जोशात राबवली गेली. राष्ट्रवादी, शिवसेना तसेच भाजपच्या बड्या नेत्यांनी येथे जोमात प्रचार केला. ऐन कोरोनाकाळात मतदान आणि प्रचाराचा हा कार्यक्रम चालला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे , राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे . या सर्व नेत्यांनी आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपूर मंगळवेढ्यात प्रचार केला होता. प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांची ज्या – ज्या गावात सभा झाल्या होत्या ; ती गावं कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.
१७ एप्रिल रोजी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर आता गेल्या चार दिवसापासून या मतदारसंघामध्ये एक हजार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या बड्या नेत्यांनी येथे मोठ्या प्रचारसभा घेतल्या . त्यांच्या सभांमध्ये मतदारसंघात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. या सभांमध्ये कोणत्याही कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नाही . त्याचच परिणाम म्हणून की काय मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, भोसे, लवंगी ही गावं कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहेत
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात कोरोनाग्रस्तांची वाढ झाल्यामुळे आता येथे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा भासत आहे . पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी लस ही अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप होत आहे . तसा आरोप विधानपरिषेदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे. तसेच, मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात लसीकरण केंद्रं वाढवावी आणि जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीसुद्दा त्यांनी केली आहे.