नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीच्या पहिल्या दिवसांपासून लसीसाठी पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटकडे आक्षेने पाहिले जात होते. आता देशभरात लसीकरण सुरू असताना लसींचा तुटवडा जाणवत आहे. यातच सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी देशातील अनेक बड्या व्यक्तींच्या दबाव टाकणाऱ्या फोन कॉल्समुळे आपल्या त्रास होत असल्याचे खळबजनक वक्तव्य केले आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांचे प्रमुखांचा समावेश आहे, असा खुलासा एका मुलाखतीमध्ये पुनावाला यांनी केला. त्यानंतर पुनावाला हे परदेशात लसीचे उत्पादन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुनावाला यांनी सूचक ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
आदर पुनावाला यांनी ट्विट करत माहिती दिली की, ब्रिटनमध्ये सर्व भागीदार आणि भागधारकांमध्ये बैठक उत्तम झाली. सांगण्यात आनंद होत आहे की कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यात जोरात सुरू आहे. मी काही दिवसांत परतल्यानंतर या सर्व गोष्टींची पाहणी उत्सुक आहे, असे सूचक ट्विट करत त्यांनी अफवांना पूर्णविराम दिला आहे.
पुनावाला यांनी आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी परदेशात आश्रय घेतल्याचे आणि लस उत्पादन देखील दुसऱ्या देशात हलवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता त्यांनी सूचक ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.