भाजप खासदार नारायण राणे यांच्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये कोव्हिड चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा असलेल्या बांद्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं.
स्वागत स्वीकारल्यानंतर फडणवीसांनी उत्साही कार्यकर्त्यांना शाब्दिक चिमटे काढले. “एक वेळ स्वागत केलं नाही तरी चालेल, पण फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करा” अशा शब्दात फडणवीसांनी उत्साही कार्यकर्त्यांचे कान टोचले.
“विनंती आहे, आपण फार चांगलं स्वागत केलंत, त्याबद्दल आभार. आपण फिजिकल डिस्टन्सिंग पळत नाही, याचे भान ठेवा. स्वागत झालं नाही, तरी चालेल पण फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला हवेत. आपल्या पंतप्रधानांनी जो आदेश दिला आहे, त्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.