मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांच्या वकिलांनीही आता गंभीर आरोप केला आहे. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. रमेश त्रिपाठी यांनी याबाबत नवी मुंबई पोलीस, गृहमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसंच सुरक्षेची मागणीही त्रिपाठी यांनी केलीय.
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या केसमध्ये रमेश त्रिपाठी हे रेणू शर्मा यांचे वकील आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. तसंच पीडित महिलेवर अर्थात रेणू शर्मा यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत आपण स्वत: लवकरच खुलासा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांचा तपास करणारा पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील अॅड. रमेश त्रिपाठी यांनी गुरुवारी केला आहे. तसेच, तक्रारदार महिलेने जर सांगितलं तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दुसरा अधिकारी देण्याची मागणीही करणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितलं आहे.