धुळे जिल्ह्यातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंगची यंत्रणा आणि श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालायातील ऑक्सिजन टँक 10 दिवसात सुरू करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय सत्तार यांनी कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधा गुन्हे दाखल करावे, अशी सुचना देखील दिली. ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या चितांजनक आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. सोशल डिस्टेंसिंग, मास्कच्या वापरासाठी लोकांना प्रवृत्त करावे. अति जोखमीच्या रुग्णांवर तातडीने उपचारासाठी अँटिजन चाचण्या वाढवाव्यात.
यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाम्नथी सी, पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख हे उपस्थित होते.