बॉलिवूडमध्ये महाराष्ट्राचा झेंडा रोवणारा मराठमोळा दिग्दर्शक निशीकांत कामत यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
निशिकांत कामत यांना काविळ झाला होता तसेच त्यांना क्रोनिक लीव्हर डीसिज होता असं एआयजी हॉस्पिटलने सांगितले . तसेच “डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नानंतरही निशिकांत यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि त्यांचे अवयव निकामी होत गेले. 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि चाहते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असं रुग्णालयाने म्हटले आहे.
निशीकांत यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या विश्वात पदार्पण केलं होतं. दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशीकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशीकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झाले होते . त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.