सातारा: सातारा जिल्हा बँकेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्हा बँक ही अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते. सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्ग्ज नेत्यांच्या लढाया बघायला मिळालेल्या आहेत. यामध्ये दस्तुरखुद्द मंत्र्यांचा पराभव देखील झाल्याचे चित्र समोर आले आहे.
जावळी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तडफदार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचा अवघ्या १ मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांना पराभवाची धूळ चारली आहे. दुसरीकडे राज्य गृहमंत्री शंभूराजे देसाई यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकरण यांनी धूळ चारली आहे. आणखी एक जागा अशी होती ज्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. स्वर्गीय विलास काका उंडाळकर यांचे सुपुत्र ऍड. उदयसिंह उंडाळकर पाटील विरुद्ध सहकार राज्यमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यातील लढतीकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असणाऱ्या बाळासाहेब पाटलांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांची थेट मदत घेतली आणि उंडाळकरांना कात्रजचा घाट दाखवला. एका-एका मताची बेरीज करत बाळासाहेबांनी भाजपच्या भोसले गटाला जवळ करुन शिष्टाईतुन लढवलेल्या निवडणुकीत परफेक्ट नियोजन करत उंडाळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला.
सहकारमंत्र्यांनी बेरजेचे राजकारण करत थेट पारंपारिक विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भोसले गटालाच जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीतील मदतीसाठी साद घातली. त्यांनी भोसलेंबरोबर कृष्णाकाठच्या जेष्ठ आणि जाणत्या नेत्यांनाही मदत करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी भोसले गटाची सर्व मते आपल्याच पारड्यात पडावी यासाठी शेवटपर्यंत मोठे प्रयत्न केले. दुसरी कडे उंडाळकरांनी एकाकी झुंझ दिली आणि त्यांचा अवघ्या ८ मतांनी पराभव झाला.