बीड – राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.
ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करत गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर कारवाई केली आहे. शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीची आहे. ते कंपनीचे संचालकही आहेत.
रत्नाकर गुट्टे इतरांच्या मदतीने गरीब शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी कर्ज योजनेचा गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. या कर्ज योजनेअंतर्गत बँका ऊस शेतकऱ्यांना (जमिनीच्या आधारे) पीकांसाठी महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ बियाणं, खतं, ट्रॅक्टर, पंप आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसा देतं.