मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दोनच दिवसांपुर्वीच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यानंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले होते. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले होते. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षात प्रवेश करणार आहेत.
खडसे यासाठी खडसे गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यादेखील आहेत.
गेली 40 वर्ष भाजपमध्ये असलेल्या खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी अशी मागणी केल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. मीदेखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं. दगड, धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षाने कमी दिलं असं नाही. पण मीदेखील पक्षासाठी ४० वर्ष काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे, असे खडसे म्हणाले होते.