मुंबई : रेमडेसिव्हीर औषधाचा साठा केल्याच्या संशयावरून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने आले आहेत. भाजपकडून यावरून ठाकरे सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. राज्याच्या अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांच्या सहमतीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती, असा दावा भाजपने केला होता. यावर आता मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही पक्षाला रेमडेसिव्हीर विक्रीचा अधिकार नसल्याचे म्हणत राजेंद्र शिंगणे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Maharashtra | No party has the right to sell Remdesivir. Some people from BJP had approached me to buy it from their supplier. They're trying to defame me. Our department will take action against those involved in black marketing of Remdesivir: Rajendra Shingne, FDA Minister pic.twitter.com/hOabwO97Kd
— ANI (@ANI) April 20, 2021
राजेंद्र शिंगणे म्हणाले की, कोणत्याही पक्षाला रेमडेसिव्हीर वाटण्याचा अधिकार नाही. भाजपच्या काही लोकांनी त्यांच्या पुरवठादारांकडून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी संपर्क केला होता. ते लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
दरम्यान, रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये जुंपल्यानंतर आता अखेर सरकारने कारवाई करत एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी परिमल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.