नागपूर : एकीकडे कोरोनारुग्ण संख्या वाढत असताना महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली आहे. विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडिंगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात पोहचली आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेसने आणलेल्या 7 टँकर्सपैकी 3 ऑक्सिजन टँकर्स नागपूर स्थानकावर उतरवण्यात आले , तर उर्वरित टँकर महाराष्ट्रातील नाशिक रोड स्थानकात उतरवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात दाखल झालेली ही पहिलीच ऑक्सिजन एक्स्प्रेस आहे.
गेली काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्यात आली होती. या एक्सप्रेसमुळे महाराष्ट्राला जवळपास 100 टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे.
दिलासादायक बातमी!
पंतप्रधान मा. @narendramodiजी आणि मा. @PiyushGoyal यांचे खूप खूप आभार!
भारत आज एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करीत असताना संपूर्ण राष्ट्र एकसंध आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून प्राणवायू प्राप्त करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.pic.twitter.com/R1L18vTRNP— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2021
ऑक्सिजन एक्सप्रेस नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून प्राणवायू प्राप्त करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.