मुंबई : राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. माजी आमदार राजीव आवळे लवकरच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत.
‘इचलकरंजी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा आणि सामान्य जनतेशी नाळ जोडला गेलेला असल्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आपण मुंबई येथे कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार’ असल्याची माहिती माजी आमदार राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोकराव जांभळे आणि मदन कारंडे यांना एकत्र आणून पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आवळे यांनी सांगितले. ‘शरद पवार यांनी सतत दलित-बहुजन समाजाचे प्रश्न सोडून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासह कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली समाजाचे प्रश्न सोडवून पक्ष वाढविण्याचे काम करुन पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारुन वाटचाल करणार’ असल्याचं आवळे यांनी सांगितले.