महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात काका पवार हे नाव अगदीच चर्चेत आहे. ५० – ५५ वजनाचा माणूस सुद्धा पैलवान होऊ शकतो आणि देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवू शकतो असा इतिहास काका पवारांनी रचला आहे.त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान लक्षात घेता आता राज्यपाल नियुक्त खेळाडू कोट्यातून अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका पवार यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी अशी मागणी कुस्तीक्षेत्रातील तमाम पैलवान मंडळींकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर रोहा (रायगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काका पवारांनी भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या समवेत महाराष्ट्र केसरी पै. दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी पै. दिलीप भरणे, आशियाई सुवर्णपदक विजेते पै. रवींद्र पाटील उपस्थित होते.
शक्य तितकी मदत काका प्रत्येक पैलवानांना करत आले आहेत. त्यामुळे काकांसारखी व्यक्ती राज्यपाल कोट्यातून खेळाडू आमदार म्हणून नियुक्त व्हावी. काकांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास कुस्ती सारख्या खेळाच्या अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जातील. ज्यामुळे अनेक सुविधांपासून वंचित असणाऱ्या खेळाला न्याय मिळेल अशी अपेक्षा पैलवान मंडळींकडून केली जात आहे.
गोकुळ वस्ताद तालमीत हरिश्चंद्र बिराजदारांच्या मार्गदर्शनाखाली काका पवार एशियाड कुस्ती स्पर्धेत खेळले असून राष्ट्रकुल सारख्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात देशाला तब्बल ३२ पदके मिळवून त्यांनी इतिहास रचला आहे. काकांच्या यशस्वी खेळाबद्दल केंद्र सरकारने “अर्जुन पुरस्कार” देऊन त्यांचा गौरव केला आहे.