आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपने प्रवक्ता नेमून पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पडळकर हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने मोठा गदारोळ उडाला होता. यावर पक्षाच्या नेत्यांची सावरासावर करताना दमछाक झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या काळासाठी पक्षाचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज (१७ ऑगस्ट) १० प्रवक्ते व ३३ चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये असून, उत्तर महाराष्ट्राची प्रवक्तेपदाची जबाबदारी खासदार भारती पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबईत राम कदम, भालचंद्र शिरसाट आणि राहुल नार्वेकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विदर्भातील प्रवक्तेपदाची जबाबदारी शिवराय कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.