मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत ठाकरे सरकारने परिपत्रक काढले आहे. यानुसार आता महाराष्ट्रात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. त्यामुळे आता सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यलयात जीन्स आणि टी- शर्ट घालता येणार नाही. तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे.
ड्रेसकोडचे नवे नियम-
- मंत्रालयात आता जीन्स टी शर्ट आता घालता येणार नाही. महिलांनाी साडी,सलवार चुडीदार,ट्राउझर पॅन्ट, त्यावर कुर्ता आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. तर पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर असा पेहराव करावा.
- गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले कपडे परिधान करू नये.
- सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी स्लीपर्स वापरू नये.
- महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट, सॅन्डल याचा वापर करावा.
- आठवड्यातील एक दिवस ( शुक्रवारी) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे परिधान करावे.
- परिधान केलेला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा