मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज मानद डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपाल कोश्यारी यांचा गौरव करण्यात आला. एका एका विशेष दीक्षांत समारोहात त्यांना डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली.
यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, डी. लिट. ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्यता नाही असे आपण मानतो, तरी देखील आयोजकांच्या प्रेमाखातर आपण ही पदवी विनम्रपणे स्वीकारीत आहे. आपण स्वत:ला ‘राज्य सेवक’ समजतो व त्याच भावनेने काम करीत आहे.
महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त करताना चारित्र्यसंपन्न युवक घडविण्यासाठी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार दिले पाहिजे असे राज्यपाल म्हणाले. त्यासोबतच शिक्षकांनी आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय संस्कृतीने नेहमीच विश्वातील चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला आहे असे सांगून विकास सर्वसमावेशक राहिल्यास देश प्रगतीची शिखरे पादाक्रांत करेल, असा विश्वास कोश्यारी यांनी व्यक्त केला.