“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या वादावरुन नाहक राजकारण सुरू आहे. शेवटी शरद पवार हे सर्वेसर्वा आहेत. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात राजकारणाच्या पलीकडे नाते आहेत. आजोबा म्हणून त्यांचा कान पकडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर होणारी टीका चुकीची आहे,” अशी प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, भाजपकडून महाविकासआघाडी सरकार कोसळणार असल्याच्या चर्चा, राज्य सरकारकडून होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा विविध विषयांवर आपली मते मांडली.
“आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, मग आपले सरकार येईल. आपले मंत्री होऊन आपली कामे होतील, अशा प्रकारची लालसा भाजप आपल्या आमदारांना दाखवत आहे. पण आमचे सरकार पाच वर्षे सुरळीतपणे चालणार आहे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले.