नाशिक – नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत भाजपात प्रवेश केला आहे. सानप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
दरम्यान, नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी सानप यांना पक्षप्रवेश देत त्यांच्याकडे मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे.