केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे काल रात्री दोन वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओल्ड प्रायव्हेट वॉर्डामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अमित शहा यांना हलका ताप असल्याचे सांगितले जात आहे.
एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांच्या देखरेखीखाली इतर डॉक्टरांच्या टीमद्वारे शहा यांच्यावर उपचार सुरू आहेत. अलीकडेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अमित शहा यांना गुरुग्राममधील मेदांत येथे दाखल करण्यात आले होते.
अमित शाह यांनी 14 ऑगस्टला स्वत: ट्विटरवर माहिती देत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. “आज माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी परमेश्वराचा आभारी आहे. यादरम्यान ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन”, असं अमित शाह म्हणाले होते.