अहमदनगर: खासदार डॉ सुजय विखे यांनी १०,००० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त / शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब नाही अश्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.
त्यावर आता खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना प्रतिक्रिया दिलेली आहे. विखे पाटील घराण्याने जर कधी फसवेगिरी केली असती तर जनतेने आम्हाला ५० वर्ष साथ दिली नसती. रेमेडीसीवर बाबत आता विरोधकांनी राजकारण सुरु केले आहे. मी आणल्या बॉक्सेस मध्ये काय होते असे महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांनी तसेच इतर काही लोकांनी विचारले आहे. इतर जिल्हातील नेत्यांना उत्तर देण्यास मी काही बांधील नाही आणि मी ते त्यांना सांगणार देखील नाही असे सुजय विखे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने जर हा प्रश्न विचारला तर मी नक्की उत्तर देईल असे देखील प्रतिपादन सुजय विखे यांनी केले आहे.
खासदार विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील मिरजगाव, माहिजळगाव, कर्जत शहर आणि राशीन येथे भेट देत कोरोना संसर्गाबाबत आढावा घेतला. तसेच याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर,किसान सेलचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, प्रकाश शिंदे, प्रकाश कदम आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
रुपाली चाकणकरांनी सुजय विखे यांच्यावर केलेले आरोप
सुजय विखे पाटील यांनी स्वतः रेमडेसिव्हिरचा साठा नगरला आणल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी हा दावा संशयास्पद असून, रेमडेसिव्हिर कोणाला वाटले ते स्पष्ट करावे, असे म्हटले आहे.
एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 25, 2021
स्वत: सुजय विखे यांनीच व्हिडिओद्वारे रेमडेसिव्हिरची माहिती दिली आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत होता. सगळेच हतबल झाले होते. लोकप्रतिनिधी म्हणून आपण हे पाहू शकत नव्हतो. त्यामुळे पक्ष बाजूला ठेवून आपल्या लोकांसाठी काही करावे या उद्देशाने खासगी विमान करून आपण दिल्लीतून ही इंजेक्शन्स आणली आहेत. यात पक्षाचा संबंध नाही, असे ते म्हणाले होते.