सोलापूर : मराठा आरक्षणावरून आधीच राजकीय वातावरण तापले असून मराठा संघटनांकडून आरक्षणासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यावर आमदार सुभाष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाबरोबर आपण कायम उभे राहणार आहोत. आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यासाठी आपण तयार आहोत. वेळप्रसंगी पदाचा राजीनामाही देऊ, असे आश्वासन आ. सुभाष देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी होटगी रोड येथील आ. सुभाष देशमुख यांच्या निवासाबाहेर आसूड आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांशी देशमुख बोलत होते. मराठा आरक्षणावर कोणाकडूनही राजकारण होत नाही. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे, केंद्राकडूनही प्रयत्न होतील. कोणताही पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणला विरोध करेल, असे वाटत नाही, असेही देशमुख म्हणाले.
राजीनामा दिला पाहिजे, एकत्र येऊन लढले पाहिजे, अशी समाजाची भावना आहे. माझ्या राजीनाम्याने जर आरक्षण मिळत असेत तर आपण एका पायावर राजीनामा देण्यास तयार आहोत. आपण लोकप्रतिनिधी आहोत. समाजाच्या भावनांचे, दुखाचे जर निवारण करता येत नसेल तर पदावर राहण्यात अर्थ नाही, त्यासाठी आपण कोणताही त्याग करू, असेही देशमुख म्हणाले.
Read Also