मुंबई: अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. मात्र, शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवलं. तसेच या मोर्चकऱ्यांची धरपकड करण्यात आली. मात्र, दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असं वाटत असतानाच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावरून भाजप नेते विधानपरिषद विरोधी नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केलीये.
मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास, त्याला शिवसेना जबाबदार असेल!
युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना व महिला कार्यकर्त्यांना झालेली मारहाण दुर्दैवी असून, संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.
त्यानुसार FIR दाखल झाला आहे. pic.twitter.com/NNiNcjXH5P— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 16, 2021
मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास, त्याला शिवसेना जबाबदार असेल! युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना व महिला कार्यकर्त्यांना झालेली मारहाण दुर्दैवी असून, संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रविण दरेकर यांनी कारवाईची मागणी केली.
दरम्यान, भाजपकडून शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना अचानक काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.