मुंबई – पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील कोरोना लसीकरणाविषयी भाष्य केले होते. यावेळी पत्रकारांनी तुम्ही लस कधी घेणार असा प्रश्न अजित पवारांना विचारला तेव्हा अजितदादांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ”पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोनाची लस दिली जात आहे. आम्हाला ज्यावेळी लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला देखील सांगू”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांना कोरोनाची लस टोचून घ्यायची असेल तर शरद पवार त्यांच्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये वशिला लावतील, अशी खोचक टिप्पणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली.
कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा, असा सवाल निलेश राणे यांनी अजितदादांना विचारला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश राणे यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे आता पाहावे लागणार आहे.
कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा??https://t.co/6qXMnXrOyk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 22, 2021