नवी दिल्ली :- राजस्थानमध्ये भाजपने कॉंग्रेसची सत्ता उलथवून लावत दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थानच्या १९९ विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचे ११५ आमदार निवडून आले आहेत. तर सत्ताधारी कॉंग्रेसला ७१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये एका उमेदवाराचा प्रचार केला होता. त्याचा निकाल आता समोर आला आहे.
एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये प्रचारासाठी २३ नोव्हेंबर गेले होते. त्यांनी माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांचा प्रचार केला होता. त्यांनी शिवधनुष्य या निवडणुक चिन्हावर उदयपूर वाटी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा भाजपाच्या शुभकरण चौधरी यांनी राजेंद्र गुढा यांचा पराभव केलाय. त्यामुळे तेलंगणात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे गेले परंतु राजस्थानमध्ये भाजपच्याच उमेदवाराने त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा गेम केला. अशी चर्चा आता वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, राजेंद्र हे राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी मतदारसंघातील गुढा या गावचे रहिवासी असून त्यांनी 2018 मध्ये बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजेंद्र गुढा गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ते बसपामधून निवडून आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते मंत्री बनले. परंतु निवडणुकीच्या आधी लाल डायरी आणि महिला संरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.