खासदार संजय राऊत हे सध्या आपल्या वक्तव्यांबाबत चांगलेच चर्चेत आहे. राऊत यांनी केलेल्या आरोग्य संघटनेच्या वक्तव्याबाबत त्यांना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं होत त्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेबद्दल केलेल्या विधानावरून राऊत यांच्यावर होत असलेल्या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून राऊतांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. “जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. या विषयावर कोणीही बोलताना दिसलेलं नाही. संजय राऊत बोलले आणि वादळच आलं,” अशा शब्दात आव्हाड यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण केले संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात-डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. ह्या विषयावर कोणिही बोलताना दिसलेले नाही.@rautsanjay61 बोलले आणि वादळच आले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 17, 2020
काय म्हणाले होते संजय राऊत नेमकं ?
खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं होतं. “जागतिक आरोग्य संघटनेच्या नादालाच लागून करोना वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेत इथून तिथून गोळा केलेली लोकं आहेत. नुकतीच रशियाची लस आली. जागतिक आरोग्य संघटना त्यांच्या विरोधात बोलली. परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या मुलीला ती लस दिलीच,” असं सांगत ‘मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो. त्याला जास्त कळतं,’ असं राऊत म्हणाले होते.