बेळगाव : महाराष्ट्रात आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे राज्याच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटकमध्ये मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या मंडळाबद्दल घोषणा केली आहे.
मराठा समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मराठा आरक्षणाची घोषणा केली होती. परंतु, तुर्तास सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाज हा दुखावला गेला होता. मात्र मराठी भाषिकांची नेहमी गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारकडून मराठा समाजासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केली आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाची घोषणा करत असताना पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.