मुंबई: आजच्या सामना अग्रलेखातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा काश्मिरप्रश्नावरुन जोरदार समाचार घेण्यात आलाय. पाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले. तसंच अमेरिकेची इच्छा आणि संकल्प यानुसार काश्मिर प्रश्न सुटावा या पाकच्या साक्षात्काराला ‘इम्रान खान के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल?, असा सणसणीत टोलाही लगावण्यात आलाय.
पाकिस्तान सध्या राजकीय, आर्थिक, सामाजिक अराजकाच्या खाईत सापडला आहे. कर्जाच्या प्रचंड बोजाखाली दबला गेला आहे. जागतिक स्तरावर त्याची पत प्रचंड खालावली आहे. ती सावरण्यासाठी इम्रान खान यांनी केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले. त्यात आता पाकिस्तानकडील अण्वस्त्र सामर्थ्याचा मुद्दा समोर आला आहे. अशा वेळी इम्रान खान यांनी कश्मीरची ढाल पुढे करणे अपेक्षितच होते. अर्थात, अमेरिकेची इच्छा आणि संकल्प यानुसार हा प्रश्न सुटावा या त्यांच्या साक्षात्काराला ‘इम्रान खान के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल? कारण हिंदुस्थानसाठी कश्मीर हा प्रश्न कुठे आहे?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अचानक कश्मीर प्रश्नाची उबळ आली आहे. कश्मीर प्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरजच उरणार नाही, असा साक्षात्कार इम्रान यांना झाला आहे. अर्थात, त्यातही त्यांचे वाकडे शेपूट वळवळलेच आहे. नेहमीप्रमाणे इम्रान यांनी त्यात अमेरिकेचे नाक ओढूनताणून खुपसलेच आहे. अमेरिकेची इच्छा असेल आणि त्यांनी संकल्प केला तर कश्मीर प्रश्न सुटू शकतो, असे इम्रान महाशय म्हणाले आहेत. मुळात कश्मीरविषयी अमेरिकेसारख्या तिसऱया देशाचा संबंध येतोच कोठे?
मध्यस्थीचे तुणतुणे थांबलेले नाही. इम्रान खान यांनी आता तेच केले आहे. कश्मीरबाबत हिंदुस्थान कोणाचाही हस्तक्षेप कदापि मान्य करणार नाही, हे माहिती असले तरीही इम्रान खान असे म्हणाले याचाच अर्थ, त्यांनाही या विषयाशी देणेघेणे नाही. त्याआडून त्यांना एकीकडे अमेरिकेची आरती ओवाळायची आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानदेखील कसा अण्वस्त्रसंपन्न वगैरे आहे याविषयी बढाई मारायची आहे. पाकिस्तानच्या शस्त्रसाठय़ात सध्या १६५ अण्वस्रे असल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे.
पुन्हा त्यांची संख्या वाढविण्याची पाकिस्तानची इच्छाही लपून राहिलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर इम्रान यांना कश्मीर प्रश्नाची आठवण झाली, हे लक्षात घ्यायला हवे. तो सोडविण्याचा राग आळवत त्यांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचे आणि ते वाढविण्याच्या त्यांच्या अधिकाराचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे.