कोल्हापूर : कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. सध्या जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. त्यामुळे उद्या बुधवार दि. 5 मे सकाळी 11 पासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यानुसार 15 मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.