कोल्हापूर: महाराष्ट्रात आता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीनंतर आता कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गोकुळच्या निवडणुकीदरम्यान कोल्हापुरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पारंपरिक वैरी माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक गट आणि पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील गट आमने सामने आलेले आहेत. टीकांचा वर्षाव दोन्ही बाजुंनी होत आहे. कालच सभेत बोलत असताना बंटी पाटील म्हणाले कि हीच योग्य वेळ आहे महाडिकांना हद्दपार करा आणि त्यांची एकहाती सत्ता घालवा. आता माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी त्यांच्या या टीकेला उत्तर दिले आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या – गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यावर बरीच टीका – टिपणी सुरू आहे . त्याचे उत्तर आज देण्याची मला गरज वाटत नाही . योग्य वेळी समक्ष चौकात उत्तर देईन . मी सर्वांचा बाप आहे , पुरुन उरणार , अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला .कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या – गोकुळ निवडणुकीतील सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीचा मेळावा झाला . या प्रसंगी महाडिक बोलत होते. महाडिक म्हणाले , लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. पण, गोकुळ गोरगरिबांचा आहे. तो दूध उत्पादक – कर्मचाऱ्यांच्या ताब्यात राहिला पाहिजे . त्याला धक्का लागता कामा नये. आरोप करणे विरोधकांचे कामच आहे. पण, तुमच्या कृपेने विजय आमचाच आहे. संघ योग्य हातात राहण्यासाठी एकही मत इकडे – तिकडे होता कामा नये.
या प्रसंगी महाडिक बोलत होते. माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, माजी मंत्री भरमू पाटील, गोकुळचे संचालक रणजित पाटील, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधीनगरातील गणेश सांस्कृतिक भवनमध्ये हा मेळावा झाला. त्याच प्रमाणे धनंजय महाडिक, भरमू पाटील, उमेदवार प्रकाश चव्हाण, संजय बटकडली, माजी संचालक बाळासाहेब पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुभाष चोथे, मार्तंड जरळी यांचीही भाषणे या वेळी झाली. उमेदवार सदानंद हत्तरकी, भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, बाबूराव मदकरी, किरण पाटील, रमेश आरबोळे, भैरू पाटील, कृष्णराव वाईंगडे, उदय देसाई, चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.