कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. गोकुळच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. अनेक वर्षांपासून चालू असलेली पारंपरिक खुन्नस या वेळी देखील पाहायला मिळालेली आहे. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यातील संघर्ष गोकुळ च्या निमित्ताने पुन्हा एकदा बघायला मिळाला होता. त्यातच सत्ताधारी आमदार बी.एन.पाटील,माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात देखील काटे कि टक्कर बघायला मिळणार आहे.
कोरोनाच्या संकट काळातही ही निवडणूक पार पडलेली आहे. जवळपास ९९% मतदान या निवडणुकीकरता झालेले आहे. गोकुळचा पहिला कल हा विरोधकांच्या बाजूनी लागला आहे म्हणजेच पालकमंत्री सतेज पाटील यांचा गट आता आघाडीवर आहे. सुरुवातीला आरक्षित जागांसाठी मतमोजणी होणार आहे. पाच जागा गोकुळच्या निवडणुकीत आरक्षित आहेत. दूध संघातील पहिल्या कलाप्रमाणे आता पाटील-मुश्रीफ गटातील भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील बायजी शेळके हे आता आघाडीवर आलेले आहेत.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आता झालेल्या पत्रकारपरिषदेत आमच्या गटाचीच सत्ता येणार आणि गोकुळ मध्ये परिवर्तन घडणार असे सांगितले आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटीलगट आरक्षित पाच च्या पाच जागांवर आघाडीवर आहे. एक मतपत्रिका बाद देखील करण्यात आलेली आहे. आरक्षित पाच जागांमुळे कोण सत्तेच्या जवळ जाणार आहे हे कळणार आहे. येणाऱ्या काही वेळातच गोकुळ वर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता गोकुळच्या मतमोजणीकडे लागले आहे.